गुरू: श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट

(सन १८४८-१९०१)

हे यजुर्वेदी ब्राहमण, शिक्षण वामोरी व धुळे येथे;अनेक सत्पुरुषांच्या सहवासात आले. परंतु नि:शंक समाधान पूर्ण दत्तावतारी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या कृपाप्रसादाने झाले. स्वामी समर्थांनी पयोनदी संगमावर त्यांना ‘ब्रहमनिष्ठ होशील बाळा । न भिणे कळि-काळा’ असा आशीर्वाद व मंत्रोपदेश देऊन त्यांचे जीवन कृतार्थ केले. (दि. १७-१२-१८६३) परिणामस्वरूपी ते ‘ब्रह्मनिष्ठ’ म्हणून शिष्यांस ज्ञात आहेत. दि. २७-४-१८७६ रोजी असाध्य रोगाने जर्जर झालेले वामनबुवा बडोदे येथील सुरसागरावर आत्महत्या करण्यासाठी गेले असता परमकृपाळू भक्तवत्सल श्रीस्वामी समर्थांनी तेथे प्रगट होऊन वामनबुवांना स्वहस्ते घरी आणून पोहोचविले, त्यावेळी त्यांच्या मातोश्री अहल्याबाई व बंधू वेणीमाधव हयांनाही श्रीस्वामी समर्थांच्या दर्शनाचा लाभ घडाला आणि ते कृतार्थ झाले.

ब्रहमचर्यपूर्ण जीवन, साधेपणा, सत्यप्रीती, नियमितपणा, स्वकार्य आणि श्रीस्वामी समर्थचरणी असीम श्रद्धा व प्रेमभाव हे त्यांचे व्यक्तिविशेष.

त्यांनी श्रीस्वामी समर्थांचे ओवीबद्ध चरित्र वर्णन करणारा पंचावन अध्यायांचा सुमारे दहा हजार ओव्यांचा ‘श्रीगुरुलीलामृत’ नावाचा अलौकिक ग्रंथ लिहिला आहे. हयात व्याकरण, न्याय, वेदांत, वैद्यक, ज्योतिष वगैरे शास्त्रांची सविस्तर चर्चा आहे, तसेच ‘प्रपंचात परमार्थ कसा साधता येईल’ याची शिकवण साध्या, सोप्या, शैलीदार भाषेत कर्तृत्वाहंकाररहित होऊन दिली आहे. याचा परिचय पूर्वीच करून घेतला आहे.

या अलौकिक ग्रंथांच्या लेखनानंतर दि. २५-३-१९०१ रोजी संन्यास ग्रहण करून ‘अद्वैतानंद’ नाम धारण करून हे समाधिस्थ झाले. हयांची समाधी बडोदे येथे प्रतापनगर रोडवरील ऋणमुक्तेश्वर महादेवाच्या मागचे बाजूस असलेल्या इदगा मैदानाच्या उत्तरेस आहे. ब्रहमनिष्ठ वामनबुवांना श्रीस्वामी समर्थांनी स्वहस्ते दिलेल्या चरणपादुका, दत्तमूर्ती, महावस्त्र (छाटी), पंचायतन वगैरे श्रीदत्तमंदिर, स्वामी विवेकानंद मार्ग, बडोदे येथे आहेत.