पृथ्वी सतत संजीवन ठेवण्यासाठी सात महान घटक द्र्व्यांची आवश्यकता असते. मरुत म्हणजे वारा, रुद्राचा अवतार, त्याचा पुरवठा होण्यासाठी व त्याचे संतुलन टिकवण्यासाठी महारुद्र मारोतीची स्थापना करण्यात आली. १९९४ च्या नवरात्रीच्या काळात या मंदिराची स्थापना झाली म्हणुन यास घट मारुती असे नाव देण्यात आले. याची स्थापना वज्रेश्वरी वृंदावन आश्रमाच्या आनंद स्वामी यांच्या हस्ते झाली. हे मंदिर म्हणजे आपल्या संपुर्ण शरीराचा अधिष्ठाता हा वायु असून या वायुचा सूत म्हणजे वायूपुत्र हनुमान हे त्याचे प्रतिक आहे. शरीरात ५ मुख्य व ५ उप वायु आहेत. ते सतत शुद्ध व पवित्र रहावेत म्हणुन कोण्या एका शक्तीने शरीराला नऊ द्वारांची योजना केली आहे. असा अभ्यास करुन शरीररुपाने दशावतार म्हणजेच दशेंद्रिय असून त्यात या दहा वायूंचा संचार होत असतो. संस्कृतमध्ये 'मरुत' या शब्दाचा अर्थ वारा असा होतो. मारुती म्हणजे वायूशक्ती यालाच रुद्राचा अवतार असे म्हणतात. शरीराला नऊ द्वारांची रचना असते. त्या वायूंचा संचार व संतुलन व्यवस्थित रहावे म्हणुन रूद्राचा मुलगा विघ्नहर्ता गणपती याची नऊ रूपात स्थापना केली आहे. अशा प्रकारे विशेष ज्ञानाचा उपयोग करुन त्याला पुराणाचे ज्ञान जोडुन मनुष्याच्या शरीरात केलेल्या या दहा गोष्टींच्या योजनेवर (दहा इंद्रीये व दहा वायू) विजय प्राप्त करुन नराचा नारायण होऊ शकतो असा अभ्यास करुन मारुती मंदिराचे प्रतिक बनविले आहे. गाभा-यात २ बाय २ फुटाच्या चबुत-यावर श्री स्वामी सखांनी स्वहस्ते बनविलेली मारुतीची गदाधारी मुर्ती स्थापित केली आहे. समर्थ रामदासांनी मारुतीची बारा स्तोत्रे केलेली आहे म्हणुन हे मंदिर पायापासुन ते कळसापर्यंत बारा स्टेपमध्ये केलेले आहे. मंदिराच्या बाहेर तीन कमानी आहेत. त्या ब्रम्हा, विष्णू व महेश यांची प्रतिक म्हणुन संबोधली जातात. आता या कमानींना सोने, चांदी व तांबे या धातुंनी मढ़विण्यात आली असुन त्या तीन कमानी मंदिराच्या मुख्य प्रवेश द्वारास लावण्यात आलेल्या आहेत. मारुती मंडपाच्या आतील बाजुस विष्णुच्या सोळा अवतारांची प्रतीकृती दहा खांबांबर आहेत. अक्कलकोट येथे श्री स्वामींनी सगुण देह ठेवुन समाधी घेतली. या जिज्ञासेने श्री स्वामी सखांनी अंश रुपाने समाधीत प्रवेश करुन श्री स्वामींचे दर्शन घेतले व तसे तंतोतंत श्री स्वामींचे समाधी स्थान मारुती मंदिरात तयार केले. मुमुक्षू व सर्वसामान्य भक्तांना समाधीस्थान आतुन कसे असते व कसे तयार केले जाते हे प्रत्यक्ष या प्रतिकृतीमधुन बघावयास मिळते.