समर्थ वाडी मध्ये प्रत्येक मंदिरांची प्रतीके तयार करण्यात आली आहे व त्या मंदिरांच्या प्रतीकामधुन मंदीरच्या स्वरुपाचा बोध होतो. राजा भगीरथाने अथक परिश्रम करुन भगवान शंकराला प्रसन्न केले व भगवान शंकराच्या जटेतील गंगा पृथ्वीवर आणण्याचे महान कार्य केले. या कार्याचे प्रतीक व स्मरण होण्यासाठी समर्थ गंगा या मंदिराची उभारणी झाली. मंदिर हे गोल महादेवाच्या पिंडी प्रमाणे असून बाहेरुन काळ्या टाईल्स लावलेल्या आहेत. आत मध्ये महादेवाची पांढ़-या पाषाणाचे लिंग व समोरच पांढरा पाषाणातील नंदिची प्रतीकृती ठेवण्यात आली आहे. या दोन्ही प्रतीकृती श्री स्वामी सखा यांचे वडील वासुदेव रामचंद्र आठल्ये यांनी तयार केलेल्या आहेत. मंदिराच्या वरती पाण्याची टाकी तयार करुन ३२ कौल लावण्यात आलेले आहे. जेणे करून टाकी भरल्यावर ३२ धारांनी ती गंगा तयार होवुन जमीनीवर उतरुन भगीरथ राजाचे स्मरण व्हावे.