गुरू: श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट

श्री परम गुरु तात महाराजांचे पूर्ण नाव रामचंद्र व्यंकटेश वराडकर. यांची जन्मतिथी श्रावण वद्य ११. ते मुंबई येथे काळबादेवी रस्त्यावरील जांभूळवाडीत धोबितलावाच्याजवळ राहत असत. त्यांना लहानपणापासूनच शिवभक्ती होती, म्हणून ते उपासनेला स्मशानात जाऊन बसत. श्री शंकराने त्यांस मार्कंडेयास दिले त्या रुपा मध्ये दर्शन दिले होते. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांनी तीन वेळा दृष्टांत देऊन "अक्कलकोटास ये" म्हणून सांगितले. पहिल्या दोन वेळेस त्यांना केवळ भास आहे असे वाटले. तिसर्या वेळेस दृष्टांत दिल्यानंतर श्री तात महाराज अक्कलकोटास गेले तेव्हा त्यांस श्री स्वामी समर्थ महाराजांनी शंकराच्या रूपानेच प्रथम दर्शन दिले व पूर्वीच्या दृष्टांताची खूण सांगितली, तेव्हापासून ते स्वमिभाक्तीस लागले. ते एक श्रेष्ठतम अधिकारी संत होते. त्यांनी पुष्कळ लोकांस स्वामीभक्तीस लावले. ते संसारात असून संसारमुक्त होते. असे असूनही त्यांनी पेन्शनीत येईपर्यंत ऑफिसर म्हणून सरकारी नोकरी केली. श्री सदगुरू बाळकृष्ण महाराज यांस त्यांनी आपल्या दैवी सामर्थ्याची प्रचीती दाकाहून त्यांचावर अनुग्रह करून स्वमिभाक्तीस लावले व जीवनमुक्त केले व आपल्या प्रमाणेच सामर्थ्यवान संतश्रेष्ठ केले. त्याचेच फळ म्हणजे श्री बाळकृष्ण महाराजांनी हजारो भक्त मंडळीच्या मनीषा पूर्ण करून व पुष्कळ लोकांना पिशाच्चबाधेतून मुक्त करून श्री स्वामी भक्तीस लावले आणि दादर व सुरात येथे श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचे मठ स्थापिले.

श्री तात महाराज मुंबईहून बेळगावास गेले, परंतु त्यानंतर त्यांचा कधीही कोठेही पत्ता लागला नाही. श्री सदगुरू बाळकृष्ण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा उत्सव श्रावण वद्य ११ रोजी दादरच्या मठात साजरा केला जातो. ते बेळगावचे गौड सारस्वत ब्राह्मण. त्यांचा भक्तगण कारवार आणि गुजरातमध्ये फार मोठा आहे.