गुरू: श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट

मूळनाव: हरिभाऊ तावडे.
गुरु: स्वामी समर्थ.
विशेष: स्वामी आज्ञे नुसार संसार संपत्ती सर्व वाटून टाकून स्वामी चरणी सेवेस सादर, स्वामींनी दिलेल्या चरणपादुका चेंबूर मठात आहेत.

पुण्यतिथी: श्रावण कृष्ण प्रतिपदा

श्रीस्वामी महाराजांची पूर्णकृपा लाभलेले व त्यांचे जन्मजन्मांतरीचे सेवक असणारे श्रीस्वामीसुत महाराज हे फार विलक्षण विभूतिमत्व होते.

श्री. हरिभाऊ तावडे ऊर्फ स्वामीसुत हे मुंबई म्युनिसिपालिटीमध्ये नोकरीला होते. त्यांनी एक व्यापार केला पण त्यात खूप नुकसान झाले. पण पुढे श्रीस्वामीकृपेने पंडित म्हणून एका गृहस्थांनी त्यांची हमी घेतली. त्यावेळी पंडितांनी अक्कलकोट स्वामींची महती ऐकून नवस केला. आश्चर्यकारकरित्या एका जुन्या व्यवहारातून पंडितांना अचानक पैसे मिळाले व त्यांनी हरिभाऊंचे कर्ज फेडले. ही स्वामीकृपेची प्रचिती आल्यामुळे सगळे मिळून पहिल्यांदाच स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटला गेले.

श्रीस्वामींनी हरिभाऊंना प्रथम भेटीतच सांगितले की, “तू कुळावर पाणी सोड व माझा सुत (पुत्र) हो !”

झालेल्या फायद्यातील तीनशे रुपये त्यांनी सोबत आणले होते, त्याच्या स्वामींनी चांदीच्या पादुका करून आणायला सांगितल्या. त्या पादुका मोठ्या प्रेमाने त्यांनी सलग चौदा दिवस वापरल्या. अनेक सेवेकऱ्यांना त्या आपल्याला प्रसाद मिळाव्यात, अशी इच्छा होती, पण स्वामींनी प्रसन्नतेने आपल्या हात, पाय, तोंड वगैरे अवयवांस लावून त्या पादुका श्रीस्वामीसुतांना प्रसाद म्हणून दिल्या. स्वत: श्रीस्वामी महाराज त्या पादुकांना आत्मलिंग म्हणत असत. त्यांनी स्वामीसुतांना तो प्रसाद देऊन, “तू तुझे घरदार, धंदा सोडून दर्याकिनाऱ्यावर जाऊन किल्ला बांधून ध्वजा उभी कर !” अशी आज्ञा केली.

त्याच रात्री गावाबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली श्रीस्वामींनी हरिभाऊंना अनुग्रह केला व उशाखालची छाटी व कफनी अंगावर फेकून कृपा व्यक्त केली.

श्रीस्वामीसुतांनी श्रीस्वामी आज्ञेचे तंतोतंत पालन करून आपला संपूर्ण संसार, घरदार लुटवले. बायकोचे दागिनेही ब्राह्मणांना दान करून टाकले. त्याकाळात ते दागिने जवळपास शंभर तोळ्यांचे होते. अंगावर मणी मंगळसूत्र देखील ठेवले नाही. स्वत: भगवी कफनी नेसले व बायको ताराबाईला पांढरे पातळ नेसायला लावून स्वामीसेवा सुरु केली. अत्यंत निस्पृहपणे व वैराग्याने त्यांनी खूप मोठे स्वामी सेवाकार्य केले. हजारो लोकांना स्वामीभक्तीस लावले. सुरुवातीला त्यांचा मठ कामाठीपु-यात होता, नंतर तो मठ कांदेवाडीत स्थलांतरीत झाला. श्रीस्वामींच्या आत्मलिंग पादुका देखील सुरुवातीला याच कांदेवाडी मठात होत्या. कालांतराने त्या मुंबईतील चेंबूर येथील मठात नेण्यात आल्या. तेथे सर्वांनी आवर्जून दर्शन घ्यावे. स्वत: श्रीस्वामींनी अनेकांना दर्याकिनाऱ्यावर जाऊन स्वामीसुतांचे मार्गदर्शन घेण्याची आज्ञा केलेेली होती.

श्रीस्वामी महाराजांच्या प्रकटदिनाच्या चैत्र शुद्ध द्वितीयेच्या उत्सवाची परंपरा श्रीस्वामीसुतांनीच प्रथम शके १७९२ म्हणजेच १८७० साली सुरू केली. अक्कलकोट येथे त्या पुढील वर्षीपासून स्वामींच्या समक्षच हा उत्सव होऊ लागला. महाराज अतीव प्रेमाने स्वामीसुतांना “चंदुलाल” म्हणत असत.

श्रीस्वामींनी आपल्या पश्चात् स्वामीसुतांना आपले कार्य पाहण्यासाठी अक्कलकोटला पाचारण केले, पण श्रीगुरूंच्या नंतर आपण राहू शकणारच नाही, असा त्यांनी पवित्रा घेतला. अनेक लोकांना स्वामींनी मुंबईला पाठवले स्वामीसुतांना घेऊन येण्यासाठी. पण शेवटपर्यंत ते श्रीस्वामींसमोर आलेच नाहीत आणि त्यांनी मुंबईतच देहत्याग केला. त्यावेळी स्वामींनी अक्कलकोटात विपरीत लीला करून स्वामीसुतांवरील आपले परमप्रेम प्रकट केले. स्वत: श्रीस्वामी महाराजांनी स्वामीसुतांच्या मातु:श्री काकूबाईंचे हरप्रकारे सांत्वन केले. स्वामी महाराजांचे आपल्या या अनन्य सुतावर विलक्षण प्रेम होते.

श्रीस्वामीसुत महाराज खूप छान भजन करीत असत. त्यांच्या अभंगरचनाही उत्तम आहेत. ते ज्या ज्या लीलांचे वर्णन करीत त्या त्या लीला स्वामी महाराज प्रत्यक्ष करून दाखवीत असत. श्रीस्वामीसुतांनी रचलेला ३१ अभंगांचा ‘श्रीस्वामीपाठ’ अत्यंत बहारीचा असून खूप प्रासादिक आहे, खूप भक्तांना त्याच्या पठणाचे अद्भुत अनुभव आजही येत असतात; ही स्वामीसुतांवरील श्रीस्वामीकृपेचीच अलौकिक प्रचिती आहे.