गुरू: श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट

वडील:बापूराव विनायक
जन्म: पंढरपूर येथे चैत्र शुद्ध ९ शके १७७६
समाधी: कार्तिक कृष्णा १३ शके १८२५

सोलापूर जिल्ह्यातील संत श्री दामाजीपंत ह्यांच्या मंगळवेढे ह्या गावी सरकारी नोकरीत असलेल्या बापूराव विनायक ह्यांचे पुत्र म्हणजेच श्री सीताराम महाराज, ह्यांचा जन्म पंढरपूर येथे चैत्र शुद्ध ९ शके १७७६ रोजी झाला. सीताराम महाराजांचे मातृछत्र लहानपणीच हरपले व सावत्र आईच्या सर्व छळास कंटाळवून वयाच्या १२ व्य वर्षी महाराजांनी घर सोडले. श्री सीताराम महाराजांच्या पूर्वसुकृताने त्यांना अक्कलकोटास खेचून आणले. तेंव्हा श्री अक्कलकोट स्वामी नुकतेच प्रगट झाले होते

महाराज अक्कलकोटास जाण्यास निघाले असताना स्वामीनी अंतर्ज्ञानाने ओळखले व ते म्हणाले ' अरे तो पहा सित्या आला त्याला लवकर आणा ' श्री सीताराम महाराज आले तसे स्वामींनी त्यांना आपल्या पोटाशी घेतले व त्यांची भोजनाची व्यवस्था केली. सीताराम श्री स्वामी महारांजवळ ६-७ वर्षे राहिले त्यांचा रोजचा कार्यक्रम म्हणजे स्वामींच्या मुद्रेकडे बघणे ,ते देतील ते खाणे व ते सांगतील ते करणे असा होता. स्वामींच्या कृपेने व अमृत दृष्टीने सीताराम कृतार्थ झाले.

एके दिवशी स्वामींनी सीतारामानं जवळ बोलावून डोक्यावर वरदहस्त ठेऊन जेथून आलास तेथे परत जा असा निरोप दिला. स्वामी म्हणाले ‘ अभि तुम्हारा हमारा कूच लेन देना बाकी नही जहांसे आया वहा चले जाव ये कली का बाजार है इसमे पागल सित्या बनके रहना ‘ स्वामींची आज्ञा मानून दामाजीपंत,चोखामेळा, कान्होपात्रा, मौनीबुवा इत्यादी संत परंपरेतील मंगळवेढा येथे सीताराम महाराज परत आले व पुढील ४० वर्षे तेथेच राहिले. समाधी पूर्वी ३ महिने उत्पात ह्यांनी त्यांना पंढरपूर येथे आणले.

विद्या धन लौकिक ह्यापैकी त्यांनी काहीच मिळविले नाही त्यांनी फक्त हरी जोडला. त्यांच्या चेहेऱ्यावर अलौकिक तेज होते वाणीत पराकाष्टेचे माधुर्य होते देहात असून ते विदेही होते.

कार्तिक कृष्णा १३ शके १८२५ रोजी त्यांनी महानिर्याण केले.

सीताराम महाराजांनी कोठे मठ स्थापिला नाही. ग्रंथ लिहिले नाहीत. शिष्यशाखा केली नाही. चमत्कार केले नाहीत किंवा आपल्यामागे आपले कोणचे स्मारक केले नाही. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे ह्या शहाण्या जगात ते अखेर पर्यंत वेडा सीतारामचं राहिले.