गुरू: श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट

जन्म: अंदाजे १८००, मंगळवेढे (पंढरपूर), उपासनी कुटुंबात
कार्यकाळ: १८०० ते १९४७
स्पर्शदिक्षा: स्वामी समर्थ अक्कलकोट
समाधी: पुणे येथे, धनकवडी, २४/०४/१९४७

श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष. त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. त्यांच्या समाधीचा दिनांक (वैशाख शुद्ध अष्टमी शके १८६९ म्हणजे) २४ एप्रिल १९४७ सोमवारी आहे. समाधीची अधिकृत नोंद आहे. पण बालपण, माता-पिता, शिक्षण, गुरू, साधना, शिष्य-संप्रदाय इत्यादींचा तपशील हवा तसा मिळत नाही.

श्री शंकर महाराज योगीराज होते, याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे. ते स्वत: मात्र नेहमी म्हणत, ‘सिद्धीच्या मागे लागू नका!’ पण त्यांनी आपले योगसामर्थ्य कळत-नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले. काहींना ‘सिद्धी’ हवी असते ती ‘प्रसिद्धी’साठी! त्याने नावलौकिक वाढतो, धन-दौलत मिळते, शिष्य-परिवार वाढतो! म्हणून श्री शंकर महाराज म्हणत ‘सिद्धीच्या मागे लागू नये’ त्यांना स्वत:ला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी धन-दौलत, नावलौकिक वा शिष्य-परिवारादि उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत. ते स्वत: खऱ्या अर्थाने सिद्धींच्या मागे लागले नाहीत. पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होत, हे चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते.

अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरू मानत. ते भक्तांना स्वामीसेवा जप करावयास लावत.

सदगुरू शंकर महाराज म्हणत असत मी आणी माझा गुरु वेगळा नाही. श्री स्वामी समर्थ हा माझ्या गुरुचा जप आहे. त्यांचे नाम घेतले की मला ते पोहोचते. जो खुदको जानता है, वो हि मुझे पहचानता है! हे त्यांचे वचन. स्वामी समर्थांना सदगुरु शंकर महाराज "मालक" म्हणत असत.

योगिराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसवून सद्गुरुचा महिमा सांगत असत. ते जेव्हा म्हणून अक्कलकोटला येत तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने साश्रुमनाने श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत. तासनतास वटवृक्षाच्या छायेत रहात. संपूर्ण रात्रभर जागरण करीत व रात्रौ गुरूशिष्यांच्या भेटी होत. त्यांच्या सोबत शुभराय मठाचे महंत जनार्दन बुवा व जानुबुवा असत. श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरू आहेत. त्यांच्या स्थानावर येऊन आम्ही सुखावतो. आपल्या सद्गुरु माऊलीच्या दिव्य समाधीवर माझ्या हातून अनेक चमत्कार घडतात. अक्कलकोटातील अनेक मान्यवर व्यक्ती महाराजांच्या भेटीला येत, महाराजांची विभिन्न नयनरम्य रूपे पाहून नम्रतापूर्वक लीन होत असत. अशावेळी अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना महाराज सांगत माझे गुरू श्री स्वामी समर्थ यांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यात श्री स्वामींची पुण्यतिथी व प्रगट दिन महाराज साजरे करायला विसरले नाहीत. योगीराज श्री शंकर महाराज नेहमी म्हणत असत, "पानी पीना छान के और गुरू करना जान के" पाणी जसे गाळून प्यावे, तसेच सद्गुरुची खरी परीक्षा शिष्याने घेऊनच त्याला ओळखावा. आपल्या मतलबापोटी, भक्तांना माळ घालून नारळ हातात देऊन, त्याच्या कडून पैसा उकळून त्यांना शिष्य करणारे व आपल्या सर्व रोगांवर उपाय सांगणारे, भक्तांचे बदलायचे ढोंगी नाटक करणारे, खोट्या आशा दाखवणार्‍या गुरूंबद्दल महाराजांना अतोनात चीड होती. आपल्या आयुष्यात दहा हजार शिष्य करून चौदाशें वर्ष जगलेले चांगदेव आयुष्यभर कोरेच होते हे महाराजांना ज्ञात होते. आपण गुरूकडे धाव न घेता गुरूच शिष्याच्या शोधात आपल्याकडे येतो. श्री स्वामी समर्थ पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात श्री शंकर महाराजांची वाट पहात होते. गरज दोघांना होती. जगाच्या कल्याणाची !

श्री शंकरमहाराज व स्वामीसमर्थ, एक हृदयस्पर्शी प्रसंग

सकाळी उठल्यापासून शंकरला उदासीन वाटायला लागलं. साधनेत मन लागेना. ज्ञानेश्वरी वाचायला घेतली पण अर्थ लागत नव्हता. स्वामींची सारखी आठवण यायला लागली. अनामिक हुरहूर लागायला लागली. असं का होत आहे ते कळत नव्हतं, स्वामींच्या भेटीसाठी जीव कासावीस होत होता. शेवटी स्वामींनाच आवाहन करून विचारलं "स्वामी आज काय होतंय मला कळत नाही, माझं काही चुकल का?"

"नाही बेटा". हे शब्द कानावर ऐकायला आल्यावरती शंकरने पाहिलं एका वटवृक्षाखाली स्वामी पद्मासनात बसले होते. मुखावर कोटी सूर्याचं तेज होते, नजर नेहेमीसारखी करडी नव्हती त्यात आईचे प्रेम झिरपत होते. शंकर आनंदाने पुढे गेला आणि स्वामींना नमस्कार करू लागला. स्वामींनी त्याला आपल्याकडे ओढून घेतलं, आपल्या हृदयाशी कवटाळल. शंकरच सर्व अंग कंपित होत गेलं. स्वामींनी शंकराकडे पाहिले आणि एक लखलखणारी ज्योत स्वामींच्या डोळ्यातून बाहेर आली आणि शंकरच्या हृदयात स्थिर झाली. शंकरला कळलं "देहाचं सगुण सरलं, देहाचं अनुबंधन तुटलं." शंकर कळवळून ओरडला "स्वामी मला पोरकं करून असे कसे जाऊ शकता?"... "पोरकं?" आकाशातून उत्तर आलं.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ।।

"अनन्यभावाने शरण येऊन जो आमची भक्ती करतो, नामस्मरणात्मक भक्तियोग आचरितो त्याचा योगक्षेम आम्ही चालवतो. आम्ही आहोत तुझा सांभाळ करायला. वडाची मूळ धरून राहा आणि आम्ही कुठेही गेलेलो नाही आम्ही तर तुझ्यामध्येच आहोत. "हम गया नही जिंदा है."

शंकरने डोळे पुसले. आणि हळू हळू सावरायला लागला. तो दिवस होता, मंगळवार चैत्र वद्य त्रयोदशी शके १८०० म्हणजेच ३० एप्रिल १८७८. आपला वारसा लाडक्या शिष्याकडे देऊन अक्कलकोट स्वामींनी वडाखाली देहत्याग केला व ते निजानंदी निमग्न झाले. तो शिष्योत्तम शंकर म्हणजेच "श्री शंकर महाराज".

श्री शंकर महाराज त्यांच्या जन्मस्थानाबद्दलचे काही वेगवेगळे संदर्भ

नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे. तिथे कुणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहात होते. पोटी मूल-बाळ नव्हते. ते शिवाचे भक्त होते. एकदा त्यांना स्वप्नात दृष्टान्त झाला. ‘रानात जा. तुला बाळ मिळेल. घेऊन ये.’ ते त्या दृष्टान्ताप्रमाणे रानात गेले. तिथे त्यांना हा दोन वर्षांचा बाळ मिळाला! शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव ‘शंकर’ ठेवले.

तसेच त्यांच्या कार्यकाळासंदर्भात पण काही आक्षेप आहेत. त्याचे पण काही दाखले काही नमूद करीत आहे.

पुण्याच्या डेक्कन कॉलेज मध्ये असणाऱ्या प्रोफेसर भालचंद्र देवांना महाराजाच्या वया विषयी कुतूहल होते. कारण प्रसंगी ते एका वयोवृद्ध वाटत तर प्रसंगी गब्रू जवाना प्रमाने वागत. एक दिवस धीर करून त्यांनी महाराजांना प्रश्न विचारलाच "महाराज! आपले वय काय असेल हो?"

महाराज उत्तरले "अंदाजे १५० वर्षे. मी शनिवारवाडयात पेशव्यांबरोबर पंगतीला बसलो आहे" ही घटना साधारण १९३५ ची आहे म्हणजे महारांजानी जेव्हा महासमाधी (१९४७) घेतली त्या वेळेस ते १६२ वर्षांचे होते.

पुण्याच्या डॉक्टर धनेश्वर ह्यांना असेच महाराजांच्या वयाबद्दल संदेह होता. त्यांनी महाराजांची परवानगी घेऊन त्यांच्या काही मेडिकल टेस्ट करून घेतल्या. त्या टेस्टचा रिझल्ट आल्यावर डॉक्टराना भोवळ आली. रिझल्ट मध्ये महाराजांचे वय १५२ वर्षे आले.