गुरू: श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट

पुण्यतिथी: वैशाख व. १३
स्मृतिमंदिर: श्री अमरे निवास , भरड , मालवण

श्रीमहाराजांचे मूळ नाव शिवराम बावडेकर असे होते . त्यांचे पूर्वज कोल्हापूरच्या छत्रपती शाहूमहाराजांच्या दरबारी सुवर्णकार होते. श्रीमहाराजांच्या लहानपणी अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थांच्या दर्शनाचा योग आला असताना श्रीस्वामी समर्थांनी त्यांना आपल्याजवळ बसवून घेतले व आशिर्वाद दिला होता. श्रीमहाराजांची प्रवृत्ती मूळचीच विरागी होती. तरूणपणी त्यांना श्रीस्वामी समर्थांचे अंतरंगशिष्य श्रीकृष्णसरस्वती (कुंभारस्वामी) यांचा अनुग्रह व सहवास लाभला. श्री महाराज रांगोळी अथवा धान्याचे पीठ इतस्तत: नुसते फेकत असत व त्यातून सुंदर रांगोळी तयार होत असे म्हणून त्यांचे श्री रांगोळी महाराज हे नाव समाजात रुढ झाले. गोव्यातील एका पोर्तुगीज अधिकाऱ्याला श्रीमहाराजांनी नुसत्या पीठाच्या रांगोळीतून प्रत्यक्ष येशूख्रिस्ताचे दर्शन घडवले होते. आपले सद्गुरु श्री चिटणीसबाबांना लहानपणी श्रीमहाराज खांद्यावर बसवून वेंगुर्ले शहरात फिरवत असत. गोव्यात त्यांना बऱ्याच काळापर्यंत गुप्तहेर समजले जात होते.

महाराज लहान असताना स्वामींनी त्यांच्या घरच्यांना हा मुलगा मला देता का असे विचारून त्यांना भगवी कफनी दिली. हीच कफनी घालून रांगोळी महाराजांनी गुरू आज्ञेनुसार तीर्थयात्रा केल्या.

त्यांनी त्यांच्या रांगोळीच्या कलेच्या देणगीचा उपयोग अर्थार्जनासाठी केला नाही. त्या कलेने पाहणारा आनंदी होतो आणि हाच माझा ईश्वर असे ते म्हणायचे.

महाराजांना सद्गुरु सेवेमुळे दिव्य सामर्थ्य प्राप्त झाले. सद्गुरू सेवा ही सर्व सुखांची व भाग्याची जननी आहे असे ते म्हणत व त्यांनी तसे आचरण ही ठेवले.