गुरू: श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट

चिपळूणचे एक दत्तभक्त म्हणून गोपाळबुवा केळकरांचे नाव प्रसिद्ध आहे. खरे म्हणजे हे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे प्रख्यात शिष्य होते. घरच्या गरिबीमुळे यांना शिक्षण घेणे जमले नाही. प्रथम यांनी रेल्वेत नोकरी केली. त्यांना मध्येच जलोदराची व्यथा जडली; म्हणून ते परत कोकणात आले. शरीराच्या पीडेमुळे यांचे लक्ष परमेश्र्वराकडे वळले. नाशिक येथील देव मामलेदार यांच्यापासून यांना प्रेरणा मिळाली. अक्कलकोट येथील स्वामी समर्थांची ओढ यांना लागली. त्यांचा यांना दृष्टांत झाला. स्वामींनी यांच्यावर दया केली.

गोपाळबुवा काही दिवस स्वामींच्याजवळ अक्कलकोट येथे राहिले. स्वामींच्या अद्भूत लीलांचे त्यांनी अवलोकन केले. गोपाळबुवांचे लग्न झाले होते. सर्व कुटुंब स्वामींच्या चरणांचे आश्रित होते. चिपळूण येथील मार्कंडी वार्डात बुवांचा निवास होता. येथे त्यांनी श्रीगुरूंच्या पादुका स्थापन केल्या. दर गुरुवारी त्यांची प्रार्थना सुरू झाली. प्रपंचात यांचे मन रमले नाही.

यांनी श्रीस्वामी समर्थांची बखर लिहून स्वामींच्या लीलांचे वर्णन केले आहे. शिवाय ‘करुणास्तोत्र’ आणि ‘साधनविवेकसारामृत’ अशी प्रकरणे लिहिली. ‘प्रीतिनंद’ असे यांचे आणखी एक नाव होते. करुणास्तोत्र २१० ओव्यांचे आहे. साधनाविवेकसारामृत या लघु ग्रंथात चार प्रकरणे असून ओव्या ११८ आहेत.

बुवांनी स्थापन केलेल्या चिपळूण येथील मठाला शंभर सव्वाशे वर्षे झाली आहेत. जन्मोत्सव, श्रावणातील उत्सव इत्यादी कार्यक्रम या मठात होतात. मठात स्वामींच्या पादुका आहेत. दंडही आहेत. नारायण दत्तात्रय केळकर हे विद्यमान अधिकारी आहेत.

गुरुपरंपरा
श्री स्वामी समर्थ

श्री स्वामीसुत

श्री गोपाळबुवा केळकर

श्री स्वामी महाराजांचे जयंतीचे कीर्तन केळकर घराण्यांपैकी कोणी करण्याची परंपरा पूर्वापार चालू आहे.जन्मवेळी श्रींचे पादुकावरील छत्र आपोआप हलते.श्री स्वामी महाराजांचे अभिवचन ‘हम गया नही जिंदा है’ या शब्दाची अनुभूती आजही हजारो लोकांना येते. या मार्कंडी मठात आजवर अनेक सिद्ध महात्मे येऊन गेलेले आहेत.