गुरू: श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट

बंधू: श्री स्वामीसुत

स्वामी सुतांनी देह ठेवल्यानंतर मुंबईतील स्वामीनाम ध्वजा कोणाकडे द्यायची हा प्रश्न असताना स्वामी महाराज तर मोरपाखरा मोरपाखरा अशा हाक मारत होते. कोणालाही हा संदर्भ लागेना मात्र काहीच दिवसात या सगळ्याचे उत्तर मिळाले. पुत्र शोकात असलेल्या काकुबाईंना भेटण्यास त्यांचे लहान चिरंजीव अक्कलकोटास आले. बंधुशोक असलेला हा ८ वर्षांचा मुलगा आपल्या नियतीशी अनभिज्ञ होता.

त्यावेळी नानासाहेब केजकर स्वामींचे दर्शन घ्यायला आले असते त्यांना केज ला मठ स्थापन करण्याची आज्ञा झाली. लहान दादांना सोबत घेऊन नानासाहेब केज ला गेले व मठ स्थापन केला. त्यानंतर दादासाहेब परत अक्कलकोट ला आले. तिथे त्यांना स्वामींनी दंड, छाटी व रुद्राक्ष माळ देऊन याला स्वामीसुताच्या गादीवर बसवा अशी आज्ञा केली. मोठया मुलाप्रमाणे याला ही नादी लावून गोसावी बनवू नाका म्हणून काकूंनी टाहो फोडला पण तिथे महाराजांनी दुर्लक्ष केले.

प्रथम गादीवर न बसता दादा मुंबईहून पळून अक्कलकोटला आले व आईला बिलगून रडू लागले. तेव्हा महाराजांनी सेवेकरी होते त्यास सांगितले की हे माझे व्याघ्रजिन घेऊन दादास त्यावर उभे करा व ही पुष्पमाला त्याला घाला. माझ्या पादुका त्याचा डोक्यावर ठेवा असे सांगून महाराजांनी स्वतः मोरपिसाच्या पंख्याने त्यास वारा घातला. या सौभाग्यमुळे तो छोटा जीव हरखून गेला व त्यांनी तत्क्षणी स्वतःच्या मोठ्या भावाच्या अधुऱ्या कार्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. ते मुंबईस आले. गादिवर बसले व स्वामी नामाची ध्वजा मुंबईत फडकवली. त्यांनी सर्वस्व अर्पण करून ही धुरा पेलली व याकाळात आत्मलिंग पादुकांची पूजा अर्चा व जपणूक केली.

त्यांच्या समाधी नंतर स्वामीसुतांची कन्या सीता म्हणजेच सिद्धा यांनी कामठी पुर्याहून मठ चेंबूर येथे हलवला.

आजही येथे उपासना मनोभावे होते व सर्व सूत्र हे सिद्धा यांचे नातू श्री हरिभाऊ नलावडे व त्यांचे वारस हे सांभाळतात.

अशाप्रकारे आपल्या कृपाहस्ताने महाराजांनी दादासाहेबाना स्वामीकुमार बनवले व ते सच्चीदानंद स्वामीकुमार म्हणून प्रसिद्ध झाले.