साधारणपणे 97 -98 मध्ये आम्ही श्री स्वामी सखा यांच्या सहवासात येऊ लागलो,त्यावेळी श्री स्वामी सखा यांची भेट आम्हाला सावरगाव येथे झाली. तोपर्यंत समर्थवाडी बद्दल आम्ही अगदी अल्प अशी माहिती ठेवून होतो. सावरगाव येथील आनंदनाथ मठ, ता येवला,एकादशी ला जात असताना तेथील जीर्णोद्धार झाल्यानंतर आम्ही सर्वजण समर्थवाडी येथे जाऊ लागलो, समर्थवाडी येथे जाण्याआधी आमचे पहिले जाणे हे गुरुदर्शन येथे व्हायचे गुरुदर्शन येथे गेल्यावर आम्हाला हसत मुखाने स्वागत व्हायचे त्या सौ मॅडम यांच्याकडून श्री स्वामी सखा यांच्या गुरु दर्शन येथील अनुपस्थितीत त्या आलेल्या सर्व स्वामी भक्तांना भेटत आणि सर्वांचे निरोप किंवा त्यांना(श्री स्वामी सखा यांना) काही निरोप द्यायचे असतील ते शब्दशः जे श्री स्वामी सखांनी सांगितलेले आहे हे जसे आणि तसे सांगत त्यात स्वतःच्या पदरचे असे काहीही नसायचे तसेच आपल्याला काही निरोप किंवा कार्यक्रम रूपरेषा सांगायची असल्यास त्या तारखेवर कोणतीही नोटिफिकेशन (न लिहिता) अगदी लक्ष देऊन ऐकत आणि त्या जसं अन तसे श्री स्वामी सखा यांच्यापर्यंत निरोप देत असत कधी कधी फोनवर सुद्धा त्यांच्याशी बोलणे झाले तरीही त्यांच्या व्यस्ततेत काही राहिले असे कधीही झालेले नव्हते.

त्यामुळे एक परफेक्ट शेड्युल त्या व्यवस्थितपणे कुठेही गैरसोय न होता कुठलाही गोंधळ न होता एकहाती सांभाळत याचे त्यावेळी आश्चर्य वाटायचे आणि आता जेव्हा प्रत्यक्ष आम्ही काम करत आहोत तेव्हा त्याचे जास्त आश्चर्य वाटते की हि ऊर्जा त्यांना कुठून येत असेल?,त्यांनी संसार सांभाळून श्री स्वामी सखा यांचे सर्व कार्यक्रम तसेच समर्थवाडी चा कारभार तसेच गुरुदर्शन येथील नित्य येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ आणि गुरुवार शनिवारची उपासना यामध्ये कधीही त्या गोंधळून गेल्या नाहीत किंवा त्या कधी कोणावर चिडल्या असे तर अजिबात दिसले नाही 2002 च्या अतिरुद्र स्वाहाकार निमित्ताने श्री स्वामी सखा यांचे नियोजन सर्व स्वामी भक्तांबरोबर असायचे तसेच त्यांचे सुद्धा फोन वर असलेले संपर्क आणि एकमेकांमधील समन्वय हा जाणवायचा.

सर्वांच्या मॅडम 'आईसाहेब' कधी झाल्या ते कळलेच नाही. तसे पाहिले तर 'मॅडम' ही एक औपचारिकता होती परंतु आईसाहेब हे एक जिव्हाळ्याचे नाते होते.

जितके म्हणून स्वामी भक्त श्री स्वामी सखा यांच्या संपर्कात होते किंवा परिचित होते तितकेच आईसाहेबांच्या ही परिचित होते.किंबहुना आलेला प्रत्येक स्वामीभक्त हा त्यांच्यासमोर आला की त्यांना जाणवत असावं कदाचित ती व्यक्ती कोण आहे, त्याचे गाव कोणते त्या अगदी आपलेपणाने विचारपूस करायच्या,कधी आलात , गाडी वेळेवर होती का?तुम्ही जेवण केलंय का तुमची काय व्यवस्था आहे. इथपर्यंत सर्व त्यामुळे प्रवासाचा सर्व क्षीण हा निघून जायचा.

त्यांनी केलेली विचारपूस ही प्रत्यक्ष श्री स्वामी सखा यांनी केली आहे अशी जाणीव होऊन जायची आणि एक नवीन उमेद यायची. वाडीत आम्ही ज्यावेळेला सेवा करायचो आणि त्यावेळेला त्या यायच्या त्यावेळी सुद्धा काय हवे काय नको याची त्या विचारपूस करायच्या तसेच त्यांचे अतिशय कटाक्षाने सर्व व्यवस्थापनावर लक्ष असायचे त्यामुळे मॅडम म्हणजेच आईसाहेब या श्री स्वामी सखा यांच्या अनुपस्थितीत सुद्धा कोणत्याही प्रकारची गैरसोय अथवा अनागोंदी होऊ देत नसत.

त्यामुळेच श्री स्वामी सखा हे अतिशय निश्चिन्त होते आई साहेबांचे स्वभाव विशेष म्हणजे त्या मितभाषी असल्या तरी त्यांचे अल्प का होईना पण बोलणे हे एका मोठ्या निबंधाला सुद्धा कमी पुरून उरेल इतके स्पष्ट आणि परफेक्ट असायचे,तसेच त्यांचा आवाज आणि बोलण्याची पद्धत ही अतिशय एका लईत होती कोणतेही कारण असले तरी त्या कोणावरही चिडत नव्हत्या तसेच त्यांची चिडचिड कधी आम्ही बघितलीच नव्हती.

त्या शांत पणे प्रत्येक प्रकरणाला हाताळत असत कदाचित यातील कुठलातरी गुणविशेष हा स्वामीभक्तांमध्ये यावा असे श्री स्वामी सखांना वाटत असावे. आईसाहेबांबद्दल काय बोलावं?

मी माझ्या आयुष्यातील एक मला आलेला अनुभव सांगू इच्छितो, तो असा की हा विषय फक्त मी, श्री स्वामी सखा आणि आईसाहेब यांच्या मधील आहे. तो आपल्या सर्वांना माहीत असावा हा अनुभव म्हणून मी सांगत आहे.

14 सप्टेंबर 2021 रोजी मला आईसाहेबांनी फोन करून सांगितले की दीपक, तुला श्री स्वामी सखा यांचे बरोबर लखनऊ येथील गोमती मठात जायचे आहे, मी तो आदेश मानला आणि तयारीला लागलो आणि गोमती मठात गेलो ज्यावेळी गोमती मठात गेलो. सुरुवातीला अतिशय प्राथमिक अवस्थेत तो मठ तयार होत होता अगदी प्राथमिक अवस्था कशीबशी राहण्या इतकी तेथील व्यवस्था होती. त्यानंतर श्री स्वामी सखा यांनी संन्यास घ्यावा असा आदेश झाला. आणि हा विषय आईसाहेबांपर्यंत गेला त्यावेळी त्यांनी दीपकला फोन केला आणि विचारले की तू कुठे आहे.? सर तुझ्या जवळ आहेत का? आणि तुझा फोन स्पीकरवर आहे का? या सर्व गोष्टीत मी त्यांच्याशी खोटे बोललो कारण श्री स्वामी सखा म्हणजेच श्रीसर माझ्या अगदी समोर उभे होते आणि मी फोन स्पीकरवर करून बोलत होतो आणि मी त्यांना नकार दिला आणि म्हटले की नाही सर हे विश्रांती घेत आहेत त्यावेळी त्यांनी मला विचारले की काय ते संन्यास घेत आहे हे खरं आहे का? त्यावेळी मी त्यांना म्हटलं हो आईसाहेब त्यांनी संन्यास घेण्याचा निश्चय केलेला आहे. त्यावेळी त्या मला म्हणाल्या, अरे,संन्यास त्यांनी घ्यावा माझी काहीही हरकत नाही परंतु आत्ता नको. त्यांना म्हणावं, "कमीत कमी एक दोन वर्ष थांबून जा आणि मग खुशाल संन्यास घ्यावा".या वाक्यातील मतितार्थ मला त्यावेळी कळला नाही परंतु श्री स्वामी सखा हे संन्यास घेण्याच्या वृत्तीवर ठाम होते, कारण ते मला म्हणून गेले की, "आईसाहेब का तयार नाही, त्याचे कारण असे आहे की त्यांना सौभाग्यवती म्हणूनच जगाचा निरोप घ्यायचा आहे. परंतु त्यांचा हा विचार मला माहित आहे म्हणूनच त्यांच्या जाण्याआधी मला संन्यास घ्यायचा आहे, आणि माझा निर्णय ठाम आहे."

19 जानेवारी संध्याकाळी सहा वाजता ज्यावेळी मला निरोप मिळाला,की आई साहेबांनी इह लोकाचा निरोप घेतला आहे, त्यावेळी मला सर्वप्रथम वरील प्रसंग डोळ्यासमोर आला की, स्वामी सखांना सांग की कमीत कमी एक वर्ष तरी थांबा म्हणून, म्हणजे आई साहेबांनी केलेला विचार किंवा त्यांना त्यांचा अंतिम दिवस कोणता असेल?कदाचित याची जाणीव होऊन गेलेली असावी. कारण हे इच्छा मरण तर नसावे? जे महामहीम भीष्माने घेतले होते! स्वतःचा मृत्यू ठरवला होता,तसे आपला अंतिम श्वास कोणत्या तारखेला असेल? हे त्या महान आत्मीय अशा सदा हसतमुख असलेल्या व्यक्तिमत्वाला माहीत असावे, आणि आयुष्याचे अंतिम सत्य त्यांनी खूप आधीच जाणले असावे म्हणूनच तर अशा पवित्र आणि महान आत्म्याने 'उत्तरायण' सुरू झाल्यावरच या इहलोकाचा निरोप घेतला परंतु आम्हा सर्व पोरांना त्या पोरक्या करून निघाल्यात.

-- दीपक बाळकृष्ण बाविस्कर,
जळगाव