श्री बाळकृष्ण महाराज (सुरतकर)
गुरू: श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट
जन्म: २८ ऑक्टोबर १८८६.
पुण्यतिथी: वैशाख कृष्ण एकादशी शके १९४०, दिनांक ११ मे १९१८.
सत्पुरुष: बाळकृष्ण महाराज, संस्थापक श्री स्वामी समर्थ मठ दादर, मुंबई व सुरत
मुंबईमधील दादर येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ अलिकडे दादर मठ नावाने ओळखला जातो. हा मठ श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज सुरतकर यांनी २९ मे १९१० साली स्थापन केला.
"श्री बाळकृष्ण शिवशंकर उपाध्ये (पाध्ये)" उर्फ "श्री बाळकृष्ण महाराज (सुरतकर)" यांचा जन्म सुरत येथे यजुर्वेदी ब्राह्मण कुळात "आश्विन वद्य पंचमी शके १७८८ (दि. २८ ऑक्टोबर सन १८६६)" रोजी झाला. लहानपणीपासूनच त्यांना देवभक्तीची व नामस्मरणाची आवड होती. त्यांच्या वडिलांचे नाव दुर्लभराम व चुलत्यांचे नाव शिवशंकर. पुढे ते आपले चुलते शिवशंकर उपाध्ये यांच्याकडे मुंबईला शिक्षणासाठी आले. चुलत्यांना मुलबाळ नव्हते म्हणून त्यांनी महाराजांना मुलाप्रमाणे वाढवले व शिक्षण दिले. यासाठीच बाळकृष्ण महाराजांनी आपल्या चुलत्यांचे नाव वडिलांचे ठिकाणी घेऊन "बाळकृष्ण शिवशंकर उपाध्ये" असे नाव धारण केले. मुंबईस आल्यावर त्यांच्यावर आर्यसमाजाच्या शिकवणीचा पगडा बसला. त्यांचे चुलते शिवशंकर उपाध्ये कट्टर शिवभक्त होते. त्यांना या गोष्टीचे दुःख झाले. त्यांचे शेजारी शिवशंकर उपाध्ये यांचे गुरू श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त "श्री रामचंद्र व्यंकटेश भेंडे" उर्फ "श्री तात महाराज" रहात असत. श्री तात महाराजांना बाळकृष्ण महाराजांच्यात सुधारणा करण्याची विनंती केली त्यांच्या चुलत्यांनी केली. त्यानुसार श्री तात महाराजांनी सदगुरु बाळकृष्ण महाराजांना भुलेश्वरच्या अष्टभुजादेवीच्या देवळात देवीचे प्रथम उग्ररूप व नंतर प्रेमळ हास्यमुखाचे दर्शन देऊन त्यांच्या वृत्तीमध्ये आमुलाग्र फरक केला. त्याचक्षणी महाराजांनी श्री तात महाराजांना गुरु करुन ते श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त बनले.
"श्री स्वामी समर्थांना शरण जाऊन व त्यांची उपासना करुन ज्याने त्याने आपला हेतू साधावा; आपणाकडे काही नाही" असे महाराज सांगत असत.
दादर मठाच्या स्थापनेनंतर सन १९११ मध्ये वडवली शेरी बेगमपुरा सुरत येथे सुद्धा महाराजांनी श्री स्वामी समर्थांचा मठ स्थापन केला. त्या मठात श्री स्वामी समर्थांची खाट (पलंग) श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे महाराजांनी अक्कलकोटला जाऊन आणली, ती त्या मठातील गाभाऱ्यात ठेवलेली आहे. महाराज नेहमी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथीची पालखी मुंबईस काढून दुसरे दिवशी तशीच पालखी सुरतेस काढण्यास जात असत, त्याप्रमाणे महाराज १० मे १९१८ रोजी रात्रीच्या गाडीने सुरतेस गेले. त्यावेळेपासून महाराजांनी निर्याणास जाण्याच्या पुष्कळ पूर्वसूचना दिल्या, पण कोणालाच समजल्या नाहीत.
वैशाख वद्य दशमी शके १८४० संवत १९७४ तारीख ४ जून १९१८ मंगळवार रात्रौ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सुरतेच्या मठात भजनाचा कार्यक्रम होत असताना महाराजांनी तो बंद करून सर्वाना घरी जाण्यास सांगितले. परंतु एक तासाने यावे लागेल असे म्हणाले. त्यांचा अर्थ त्यावेळी कोणालाही कळला नाही. सूर्योदय होण्याच्या थोड्या वेळापूर्वी महाराज मागील चौकात गेले. तेथे एक दोरी टांगलेली होती. तिला धरून महाराज नाचू लागले. 'खडावांचा खड खड खड खड ' असा आवाज ऐकून परमपूज्य आई खाली आल्या व महाराजांस म्हणाल्या, "दोरी जुनी आहे, ती तुटेल व तुम्ही पडाल." महाराजांनी उत्तर दिले, "दोरी तर केव्हाच तुटली आहे, ह्या घे किल्ल्या !" असे म्हणून त्या प. पु. आईच्या अंगावर फेकल्या व म्हणाले, "सांभाळ." प. पु. आई म्हणाली, "मला किल्ल्या का देता?" इतक्यात सूर्योदय झाला. सूर्यास नमस्कार करून बाजूला असलेल्या आरामखुर्चीवर बसून छातीवर हात ठेवून त्रिवार "ओ तात, ओ तात, ओ तात" असे स्मरण करून महाराजांनी मान टाकली. याप्रमाणे महाराज "वैशाख वद्य एकादशी शके १८४० संवत १९७४ बुधवार, तारीख ५ जून १९१८ रोजी" सूर्योदयी" निर्याणास गेले.