गुरू: श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट

पुण्यतिथी: १९०३ साली ज्येष्ठ शुद्ध षष्ठी
मठ: वेंगुर्ला येथेच आत्मलिंग पादुका आहेत.

राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामीसमर्थ महाराजांच्या प्रभावळीत फार फार मौल्यवान रत्ने, श्रीस्वामीकृपेनेच लाभलेल्या अपार तेजाने तळपताना दिसतात. या अनर्घ्य रत्नांपैकी, एक अलौकिक विभूतिमत्व म्हणजेच, सद्गुरु श्रीआनंदनाथ महाराज हे होत. श्रीआनंदनाथ महाराज हे तळकोकणातील वालावल गांवचे, म्हणून त्यांचे नाव पडले वालावलकर. पुढे ते वेंगुर्ले कॅम्प परिसरात स्वामी महाराजांचे मंदिर बांधून राहू लागले. तिथेच त्यांनी १९०३ साली ज्येष्ठ शुद्ध षष्ठीला जिवंत समाधी घेतली.

श्रीस्वामी महाराजांची कीर्ती ऐकून श्रीआनंदनाथ महाराज अक्कलकोटी दर्शनासाठी निघाले. इकडे श्रीस्वामीमाऊलीलाही आपले लाडके लेकरू कधी एकदा भेटते असे झाले होते. म्हणून श्रीस्वामीराज महाराज स्वत:च अक्कलकोटाबाहेर येऊन एका झाडावर वाट पाहात बसले होते. श्रीआनंदनाथ महाराज नेमके तेथेच येऊन जरा विसावले. झाडावरून उडी टाकून श्रीस्वामीराजांनी त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांना खूण दाखवली. आपली परब्रह्ममाऊली साक्षात समोर उभी राहिलेली पाहून श्रीआनंदनाथांनी गहिवरून त्यांचे श्रीचरण हृदयी कवटाळले. श्रीस्वामीरायांनीही आपल्या जन्मजन्मांतरीच्या या लाडक्या निजदासाच्या मस्तकी कृपाहस्त ठेवून पूर्ण कृपादान केले. तसेच तोंडातून कफाचा बेडका काढून त्यांच्या ओंजळीत टाकला. त्या बेडक्यात इवल्याशा श्रीचरणपादुका स्पष्ट दिसत होत्या. हेच श्रीस्वामी महाराजांनी श्रीआनंदनाथांना प्रसाद म्हणून दिलेले 'आत्मलिंग' होय. आजही ते दिव्य आत्मलिंग वेंगुर्ले येथे नित्यपूजेत असून दर गुरुवारी भक्तांना त्याचे दर्शन मिळते.

श्रीआनंदनाथांनी जवळपास सहा वर्षे अक्कलकोटात श्रीस्वामीसेवेत व्यतीत केली व नंतर श्रीस्वामीआज्ञेने ते प्रचारार्थ बाहेर पडले. येवल्याजवळ सावरगांव येथेही त्यांनी आश्रम स्थापन केला. मात्र पुढे ते वेंगुर्ले येथेच स्थायिक झाले. शिर्डीच्या श्रीसाईबाबांना सर्वप्रथम, जगासमोर आणण्याची श्रीस्वामीरायांची आज्ञा श्रीआनंदनाथांनी पूर्ण केली. साईबाबा हा साक्षात् हिरा आहे, हे त्यांनीच प्रथम लोकांना दाखवून दिले.

श्रीआनंदनाथ महाराज हे सिद्धहस्त लेखक व कवी होते. त्यांच्या श्रीस्वामी महाराजांवरील अप्रतिम रचना 'स्तवनगाथा' मधून प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांचे "श्रीगुरुस्तवन स्तोत्र" तर असंख्य स्वामीभक्तांच्या नित्यपठणात आहे. त्यांनी रचलेला श्रीस्वामीपाठ देखील प्रासादिक असून स्वामीभक्तांनी नित्यपठणात ठेवावा, इतका महत्त्वाचा आहे. श्रीआनंदनाथ महाराजांवर श्रीस्वामी समर्थ महाराजांची पूर्णकृपा असल्याने त्यांचे सर्व वाङ्मय प्रासादिक, महिमाशाली व अतीव मधुर आहे. श्रीआनंदनाथांचा स्तवनगाथा फार सुरेख, भावपूर्ण आणि स्वामीस्वरूपाचे यथार्थ वर्णन करणारा आहे. आपल्या दोन हजारांहून जास्त अभंगरचनांमधून त्यांनी श्रीस्वामीस्वरूप व श्रीस्वामीनामाचे अलौकिक माहात्म्य सुरेख, भावपूर्ण आणि मार्मिक अशा शब्दांत स्पष्ट करून सांगितलेले आहे. त्यांच्या अपार प्रेमाने भारलेल्या या रचना वाचताना आपल्याही अंत:करणात स्वामीप्रेम दाटून येते व हेच त्यांना अपेक्षितही होते. "श्रीस्वामी पवाडा गाण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे," हे ते वारंवार सांगतात. त्यांच्या दिव्य रचना आज शतकापेक्षाही जास्त काळ झाला तरी स्वामीभक्तांच्या ओठी रंगलेल्या आहेत, हीच त्यांच्या अद्भुत स्वामीसेवेची पावती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.