स्वामी सखा
श्री
स्वामी समर्थांचा कृपाप्रसाद म्हणुन चार तांदळाचे दाणे व दोन घोंगडीच्या दशा घराण्यातील एका पुर्वजास मिळाल्या होत्या. देवधर्म हा नुसता कर्मठपणा नसुन त्याला भक्तीची जोड असणा-या वाडवडिलांकडुन भक्तीचा वारसा व वारंवार घडणारा संत सहवास, अशी पुर्वसुकृताची जोड आठल्ये घराण्याला मिळाली होती. अशा अध्यात्मिक घराण्यात स्वामी सखा यांचा जन्म १९५५ साली २४ जानेवारीस दु. २ वा. ईश्वरपुर येथे झाला.
लहानपणापासुनच स्वामी सखा यांना वडीलांकडुन गुरुभक्तीचा वारसा मिळाला. १९२३ पासुन आठल्ये कुटुंबीयांतर्फे ईस्लामपुर येथे दत्त जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्याप्रमाणे स्वामी सखा यांनी ही परंपरा समर्थवाडीत चालु ठेवली आहे. वडीलांचे सर्व गुण (मुर्तीकला, रांगोळी, गायन व वादन) त्यांनी आत्मसात केले. अतिशय बिकट परीस्थितीत त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले. याच दरम्यान त्यांना श्री धोंडीबा मुधाळे, स्वामी स्वरुपानंद्, भालचंद्र महाराज यांचा सहवास १/२ वर्षे लाभला. १९७४ ते १९७६ साली स्वामी सखा कोल्हापुर येथे उच्च शिक्षण घेत असतांना त्यांचा संबंध चिले महाराजांशी आला. त्यावेळी नाना कोतेकर हे कोल्हापुरात कसबा पेठ येथे रहात होते. चिले महाराजांनी घेतलेल्या सर्व कसोट्यांना पुर्णपणे खरे उतरल्याने महाराजांनी त्यांच्यावर पुर्ण कृपा केली.
वडीलांच्या मृत्युनंतर त्यांनी ईश्वरपुर सोडुन पुण्यातील शंकर महाराजांच्या मठात काही काळ काढला. १९७९ च्या सुमारास ते ठाण्यास आले. येथे रांगोळी प्रदर्शन भरवुन त्यांनी चरीतार्थ चालवीला. त्यानंतर नेरळ येथे रहावयास गेले. स्वप्नात झालेल्या दृष्टांतानुसार पेब किल्याचा विकास केला. गडावर शिवरात्र, होळी सारखे सण व अध्यात्मिक शिबीरे आयोजित करण्यात येतात. आता येथे प्रति गिरनारची स्थापना करण्यात आली आहे.
१९८१ मध्ये स्वामी सखा यांना आय टी आय मध्ये नौकरी मिळाली व त्यामुळेच त्यांना 'सर्' हे नाव रुढ़ झाले. १९८३ साली त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नी सौ. विद्याताई (विद्युलता विनायक रीसबुड, कल्याण. मुळचे दापोली, जि. रत्नागिरी) यांनी संसार तर केलाच पण त्याबरोबर स्वामींना अध्यात्मिक साथही दिली. त्यांच्या या सहकार्यामुळेच 'समर्थवाडी' हे वटवृक्ष उमलले.
भौगोलिक दृष्य्या समर्थवाडीत बांधकाम करणे कठीणच तरीही वाडीतील मंदिरांव्यतिरीक्त धरण व पाण्याच्या टाक्या बांधल्या. समर्थवाडीचे हे कार्य केवळ दिव्य व अतुलनिय आहे. श्री स्वामी सखा यांनी जवळ एकही पैसा न घेता अयाचित वृत्तीने १८,००० किमी पायी प्रवास केला. यामध्ये अक्कलकोट पदयात्रा, कृष्णा परीक्रमा, नर्मदा परीक्रमा, अष्टविनायक, गिरनार परीक्रमा, जगन्नाथपुरी अशा काही महत्त्वाच्या प्रदक्षिणा आहेत. तसेच चारधाम यात्रा, कैलास मानसरोवर, नवद्त्तधाम, अंदमान निकोबार अशा काही अध्यात्मिक सहलीही काढल्या. हे सर्व अफाट कार्य करत असतांना महाराष्ट्रभर प्रवचने, अध्यात्मिक कार्यक्रम करुन स्वामीभक्तांना योग्य ते मार्गदर्शन केले. सावरगाव, ईस्लामपुर, लोनावळा येथे जाऊन तेथील मंदिरांचा जिर्णोद्धार केला. अक्कलकोट येथे महाराजांच्या समाधीवर ११ किलो चांदिचे आवरण घातले तसेच श्री राजेराय मठात व हक्याच्या मारुतीला चांदीचा मुकुट भेट दिला. अक्क्लकोट येथील अन्नछत्र मंडळाला भेट दिलेली चांदीची पालखी आज महाराष्ट्रभर फिरत आहे.
अध्यात्माबरोबरच शेतीचीही आवड असल्याने ईस्लामपुर जवळील रेठरेधरण येथे अवघ्या अडीच एकर मध्ये जणु काही स्वर्गाची निर्मिती केली आहे.