आपल्या जीवनाच्या प्रवासात आपण आपल्याच समस्या, विवंचना, चिंतांचा सामना करत, त्यातून मार्ग काढत पुढे पुढे जायचा प्रयत्न करत असतो. या प्रवासात कित्येकदा एकटं, एकाकी, असहाय्य वाटतं. ध्येय समोरून खुणावत असतं, पण शरीर व मनात त्राणच उरलं नाही असं वाटतं. आणि हिच ती वेळ असते जेव्हा गुरूंची नितांत आवश्यकता भासते. अशा वेळी गुरूंनी आपल्याला जवळ घ्यावं, आपल्याला धीर द्यावा, आपल्याला सांभाळून घ्यावं असं कळवळून जाणवतं.....हो, आम्ही देखील या सगळ्यातून गेलो आणि आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावर हेच गुरुतत्व आमच्या आयुष्यात अचानक, अवचितपणे आलं, श्री सुमंत वासुदेव आठल्ये ऊर्फ आठल्ये सर ऊर्फ श्री स्वामी सखा सुमंत सरस्वती यांच्या रूपात! आमचा औपचारिक परिचय साधारण 1995 च्या सुरुवातीलाच, पण 1995 च्या श्री हनुमान जन्मोत्सवापासून हा अनुबंध दृढतेकडे वाटचाल करू लागला. गुरु हा पिता असतो, माता ही असतो, ताता, त्राता, धाता, अन्नदाता असतो. गुरु तारणहार, पालनहार, रक्षणकर्ता असतो, गुरु सर्वस्व असतो.

गुरूंमधलं पितृस्वरूप जे असतं, त्याचा धाक वाटतो, वचक वाटतो, दरारा वाटतो आणि सर या वर्णनाबरहुकूम तंतोतंत आहेत.

अशा परिस्थितीत गुरूंपर्यंत पोहोचायचं असेल, आपलं बोलणं, आपले विचार, आपली विवंचना, आपलं गा-हाणं गुरूंपर्यंत पोहोचवायचं असेल तर एक मधला दुवा आपल्या आणि गुरूंच्या, आवश्यक असतो. आणि हा दुवा स्वाभाविकपणेच कोमल, वात्सल्यपूर्ण असणं देखील आवश्यक असतं. आणि आमच्या सर्वांसाठी हा दुवा म्हणजे 'मॅडम', अर्थात, सौ विद्या सुमंत आठल्ये, साक्षात गुरुमाई......आपल्या मनीचं गूज गुरुमाई ला सांगितलं की जसंच्या तसं ते सरांपर्यंत पोहोचणार याची निश्चिंती! कुठेही न लिहिता, न टिपता, प्रत्येक निरोप सरांपर्यंत पोहोचायचा. हो, गुरूंच्या साधनेत, उपासनेत आपल्यामुळे व्यत्यय नको म्हणून गुरुमाई कडून निरोप धाडायचा.

मॅडमना सर पती म्हणून मिळणं ही देखील त्यांच्या एका नि:शब्द तपश्चर्येची सार्थकता होती. आपल्याला एक चांगला पती मिळावा म्हणून लग्नाआधी मॅडम प्रत्येक गुरुवारी दत्त मंदिरात पाच पेढे ठेवायच्या. याचं फलित म्हणूनच मॅडमना सरांसारखा जीवन सहचर लाभला.

मॅडमनी सरांबरोबर प्रपंच देखील नीटनेटका, निगुतीने केला. त्यांच्या संसारवेली वर प्रद्युम्न ऊर्फ रावसाहेब आणि ॠतुजा अशी दोन फुले उमलली.

1995च्या श्री हनुमान जन्मोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर स्थापन झालेल्या श्री समर्थ वाडीचा एकंदर कारभार सध्या श्री प्रद्युम्न ऊर्फ रावसाहेब व सरांच्या स्नुषा सौ वेदा सक्षमपणे सांभाळत आहेत.

एक महत्वाचा मुद्दा म्हणजे, अध्यात्माच्या, परमार्थाच्या मार्गावर कार्यरत असलेला सरांसारखा पती म्हणजे साक्षात धगधगता अंगार! अशा धगधगत्या अंगाराबरोबर प्रपंचाचा गाडा ओढणं म्हणजे क्षणोक्षणी परीक्षा, क्षणोक्षणी तारेवरची कसरत! ही कसरत देखील मॅडमनी लीलया केली, नव्हे, पेलली. मात्र हे करताना कित्येकदा आपलंच मन मोडावं लागतं, समझोता करावा लागतो, खूप त्याग करावा लागतो. आणि हे सारं काही मॅडमनी अगदी सहज केलं. काही गोष्टींना मुरड घातली, काहींचा त्याग केला आणि काही नवीन गोष्टी स्वीकारल्या देखील. फक्त आणि फक्त सरांसाठी. सर्व प्राधान्य सरांना आणि स्वतःला मात्र दुय्यम स्थान! सरांच्या धगधगीत परमार्थाला स्वतःच्या भक्तप्रेमाची हळुवार झालर प्रदान केली, सरांच्या अध्यात्माला संपूर्णपणे वाहून घेऊन. सरांचा भक्त परिवार हा स्वतःचा परिवार मानला, त्या भक्त परिवारासाठी स्वतःला वाहून घेतलं. त्या सगळ्या भक्तांची गुरुमाई, आई झाल्या.

मॅडम सरांच्या प्रपंचात आणि परमार्थात दोन्ही मध्ये संपूर्ण समरस झाल्या होत्या. अगदी दुधात साखर विरघळावी तशा. मला आठवतंय, भक्तजनांना संबोधायचं, उपदेश करायचा, आशीर्वचनांनी कृपांकित करायचं हे सगळं काही सरच करायचे. मॅडमना कधीही भक्तगणांशी मंचावरून संवाद साधण्याची वेळ आली नव्हती. अशाच एका समारंभात सरांनी अचानक मॅडमकडे माईक दिला व त्यांना बोलायचा आदेश दिला. अचानक आलेल्या या संधीने त्या गांगरल्या असं म्हणता येणार नाही. त्यांचं प्रसंगावधान अलौकिक होतं. फक्त एका वाक्यात मॅडमनी आपलं मनोगत अतिशय सार्थपणे व्यक्त केलं, "सावलीला कधी अस्तित्व असतं का?" बस्स! या एका वाक्याच्या मनोगतामधे किती गहिरा अध्यात्मिक अर्थ दडला आहे पहा. सरांसारख्या डेरेदार वटवृक्षाची सावली होऊन, त्या सावलीची झूल प्रत्येक भक्तावर, सेवेक-यावर तन्मयतेने, तल्लीनतेने, समरसतेने पांघरण्यातच धन्यता मानणा-या मॅडम! ती सावली ही वटवृक्षाची आहे, तेव्हा, म्हटलं तर अस्तित्व आहे, म्हटलं तर शून्य! मॅडमनी सावली होऊन आपल्या वात्सल्याचं एक वेगळंच अस्तित्व निर्माण केलं.

हे सगळं कसं 27 वर्षं अविरत चालू होतं. एक आश्वस्तपणाची भावना, एक खंबीर आधार जाणवायचा. गुरुमाई म्हणजे मूर्तिमंत प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, करुणा, वात्सल्य! सरांकडे येताना चाहूल घ्यायची, सर आहेत का, उपासनेत आहेत का, अनंत प्रश्नांचं काहूर आणि तिथे पोहोचताच पहिलं कोण सामोरं यायचं, तर मॅडम! सगळं काहूर शांत व्हायचं आणि मनाच्या विशाल सागरावर शांत अध्यात्माचे तरंग विलसायचे!

पण हे सगळं व्यवस्थित सांभाळताना मॅडम अंतरातून कशाशी दोन हात करत होत्या हे कुणालाच कळलं नाही. ही झुंज एकाकी होती, कुणालाच कशाची काहीही कल्पना नव्हती. ही झुंज परवा अचानक संपली. सरांच्या सेवेत तेवणारी एक अखंड ज्योत शांत झाली, कायमची. वात्सल्याचा एक अथांग सागर थंड झाला, कायमचा. मॅडम आपल्या सर्वांना अजिबात पूर्व कल्पना न देता आपल्या निजधामाला प्रस्थान करत्या झाल्या. गुरुस्थान गुरुमाई शिवाय रितं, रिकामं झालं. असंख्य भक्तांवरील मातृछत्र हरपलं. प्रत्येक भक्त पोरका झाला, अनाथ झाला. आईविना भिकारी झाला जणू......

आणि या जगातून निरोप घेण्यासाठी मॅडमनी दिवस पण कुठला निवडला? तर गुरुवार! तिथी पौष कृष्ण त्रयोदशी! प्रदोष! गुरुवार आणि प्रदोषाला नाथ संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि मॅडमनी नेमका प्रदोष साधला, आपल्या गंतव्याकडे प्रस्थान ठेवायला. पतीसेवेची, भक्तगणसेवेची, प्रपंचाची, परमार्थाची सेवा परिपूर्ण करून, तरीपण, कुठेतरी सहचर्याचा डाव अर्ध्यावर सोडून, प्रपंचाच्या सारीपाटाचा डाव अर्ध्यावर मोडून, प्रदोषाच्याच मुहूर्तावर अनंतालाच गवसणी घालायला निघाल्या.......

सगळंच शांत झालं, रितं, रिकामं, ओकंबोकं झालं. भक्त आणि सरांच्या मधील भक्तिमय प्रेमाच्या माळेतील सर्वात महत्वाचा मणी, मॅडम, निखळून गेला. ती माळच जणू पूर्णपणे विखरून गेली.

प्रत्येक भक्ताचं मन आक्रोश करतं आहे, आक्रंदतं आहे.....

|| प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई, बोलावू तूज आता, मी कोणत्या उपायी........||

-- अविनाश मनोहर गंद्रे उर्फ श्री काका,
कल्याण